भूतान – सुखी देशाची सफर

भूतान हा आपला चिमुकला शेजारी देश. निसर्गसंपन्न म्हणून सर्वपरिचित आहे. भारताची मदत घेत त्यांनी आपले स्वातंत्र्य अनेक वर्षे अबाधित राखले आहे. या वर्षात भूतानला कार्बन निगेटिव्ह आणि आनंदी माणसांचा देश म्हणून विशेष प्रसिद्धी मिळतेय. इथे बुद्ध धर्माचा विशेष प्रभाव आहे. इथली मुख्य भाषा आहे जोंगखा आणि चलन नोग्रुम हे भारतीय रुपयाच्या तुलनेत समान पातळीवर आहे. जनतेच्या मनात राजघराण्याबद्दल अतिशय आदर आणि प्रेम आहे. राजाच्या संमतीने लोकशाही निवडणूका होतात. २००९ सालापासून राष्ट्रीय विधानसभेने शून्य कार्बन तत्वाचा स्वीकार करून देशाची त्या दिशेने वाटचाल ठेवली. आता त्याचेच सकारात्मक फलित रूप सर्व जगाचे लक्ष वेधून घेत आहे. संकल्प टूर्सच्या भूतान सहलीमध्ये आम्ही पारो, थिम्पु आणि पुनाखा या महत्वाच्या ठिकाणांना भेट दिली.

बंगालमधल्या बागडोगरापासून रस्तामार्गे फुटशोलींग पार करून आपण भूतान मध्ये प्रवेश करतो. तिथे जाण्यासाठी आम्ही बंगालमधल्या जलमपारा नॅशनल पार्कला गेलो. सकाळच्या जंगल सफारीच्या वेळी मोर, हरीण , हत्ती ,गेंडे वगैरे प्राणी फिरलेच पण दोन गेंड्यांची चित्तथरारक फाईट आमच्या जीपसमोर बघायला मिळाली. भुतानहून परतीच्या प्रवासातही आम्ही एक दिवस लतागुडी या ठिकाणी राहिलो आणि गोरूमारा जंगलात जीप सफारीस गेलो. दोन (बायसन) रानगायांना आमची चाहूल लागली आणि ते आमच्या दिशेने चाल करून आले. सगळ्यांची भीतीने गाळण उडाली होती. आमच्या जीप चालकाने चपळाई करून जीप मागे घेतली आणि आम्ही तिथून काढता पाय घेतला. हा अनुभव इतका जबरदस्त होता की कोणालाही फोटो, व्हिडीओ घ्यायचे भान राहिले नाही.

फुटशोलींगला इमिग्रेशन कचेरीतून भुतानसाठी परमिट घ्यावे लागते. त्यासाठी अर्धा दिवस ठेवावा लागतो. इथून पुढे अर्धा किलोमीटरच्या आताच चढ सुरु होतो. नंतर वळणावळणाच्या रस्त्याने हिरव्यागार जंगलाचा नजारा डोळ्यात साठवत थिम्पु कधी गाठले ते कळलेच नाही.इवल्याश्या रिमझिम पावसामुळे मस्त गारवा जाणवत होता. आणि या सुखाच्या लहरीवर आम्ही सगळे विराजमान झालो होतो. वाटेत एका ठिकाणी चहासाठी थांबलो ते हॉटेल कड्याच्या टोकावरच होते. हॉटेलच्या काचेच्या खिडकीतून ढगांच्या दुलईत लपेटलेल्या मागच्या डोंगररांगा बघत गरमागरम चहा पिणे म्हणजे अप्रतिम आनंद ! थिम्पु सध्याची भूतानची राजधानी आहे. डोंगरउतारावरची सुबक घरे याची शोभा वाढवतात. राजाचा जुना राजवाडा सध्या सरकारी कार्यालयांसाठी दिलेला आहे. संध्याकाळी ६ नंतर रंगीत दिव्यांची रोषणाई केली जाते. त्यावेळी पर्यटकांना राजवाड्यात फिरण्याची परवानगी आहे. यावेळी गाईड फार आवश्यक आहे. भूतानचा राजा त्याच्या पारंपरिक छोट्याशा घरातच अगदी सामान्यांसारखा राहतो. हि गोष्ट सर्व भूतान वासियांना अतिशय अभिमानाची वाटते. थिम्पु मध्ये एका टेकडीवर शाक्यमुनी बुद्धाचा १६९ फूट उंचीचा पुतळा आहे.

थिम्पु ते पुनाखा या वाटेवरच्या दोचुला पास या ठिकाणी १०८ स्तूप बांधले आहेत. त्यांना दृक वांग्याल स्तूप म्हणतात. समोरच टेकडीवर एक बुद्ध मंदिर आहे. मधल्या विस्तीर्ण पटांगणावर दरवर्षी डिसेंबरमध्ये उत्सव असतो. ढग आणि धुके यांच्या बरोबरचा जंगलातल्या झाडांचा चालणारा अविरत खेळ मनात अजूनही रेंगाळतोय ! १९५५ पर्यंत पुनाखा हीच भूतानची राजधानी होती. इथे ‘पॅलेस ऑफ ग्रेट हॅप्पीनेस’ हे राजाचे हिवाळ्यातले निवासस्थान आहे. रितशा व्हिलेज हे पुनाखा खोऱ्यातले पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेले गाव ! इथली घरे दगडांच्या पायावर पण माती व लाकडाने बांधलेली आहेत. टुमदार दोन माजली घरांभोवती भाज्या आणि फळांची छोटीशी बाग, अतिशय सुंदर दिसते हे गाव!

सगळ्यात शेवटी आम्ही पारोला आलो आणि इथल्या रिंगपुंग झॉन्ग मधल्या फेस्टिवलला हजेरी लावली. पारंपरिक भूतानचा पारंपरिक वेष म्हणजे पुरुषांचा गुडघ्यापर्यंतचा घो आणि बायकांचा किरा ! रंगेबिरंगी कपड्यातले कलाकार आणि विदूषक सगळ्यांचे मनोरंजन करत होते. काही हजार लोक तेंव्हा तिथे असूनही कमालीची स्वच्छता होती.इथला प्रत्येक नागरिक स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि हसतमुख राहणे हे माझ्या देशाचे ब्रीद आहे या जाणीवेने आणि जबाबदारीने वागतो. भूतानचे एकमेव विमानतळ पारोल आहे. चौफेर टेकड्यांच्या मधोमध असल्यामुळे विमानाचे टेकऑफ आणि लँडिंग यासाठी जबरदस्त कौशल्य हवे. दुसऱ्या दिवशी आम्ही चेले ला या ठिकाणी गेलो. भूतानमधला हा सर्वात उंचीवरचा गाडीरस्ता ! वाटेत एका ठिकाणी ताज्या पांढऱ्या शुभ्र बर्फात मनसोक्त हुंदडून घेतले.

भूतान मध्ये तंबाखुजन्य पदार्थ , सिगरेट यांच्या विक्रीवर बंदी आहे. इथे आम्हाला एकही भिकारी किंवा लाचार व्यक्ती आढळली नाही. घरातली, दुकानातली माणसे , आमचा ड्राइवर याना कधी चिडलेले, त्रासलेले आम्ही पहिले नाही. इकडे डॉक्टर्स, दवाखाने यांची संख्या लक्षणीय कमी आहे. भूतान हा खऱ्या अर्थाने आनंदी , सुखी माणसांचा देश आहे. हे समाधानी वातावरण सगळ्या देशात राखण्यात जनतेबरोबर प्रशासनाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रांनी भूतानचा सन्मान केला आहे. सध्या कित्येक परदेशी विद्यार्थी या सुखी माणसाच्या सदऱ्याचा सखोल अभ्यास करत आहेत.

– राजश्री फणसाळकर
   (संकल्प टूर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu